फुलपाखरे
धरू नका ही बरे । फुलांवर उडती फुलपाखरे! ॥ धृ.॥
काल पाकळ्या रात्री निजल्या
सकाळ होतां सगळ्या उठल्या
आणि त्याच का उडू लागल्या
पंख फुटुन गोजिरे । फुलांवर उडती फुलपाखरे! ॥ १ ॥
मजेमजेचे रंग तयांचे
संध्याकाळी जसे ढगांचे
ऊन कोवळे त्यावर नाचे
सकाळचे हासरे । फुलांवर उडती फुलपाखरे! ॥ २ ॥
फुलाफुलांशी हासत खेळत
फिरती भवती पिंगा घालित
बघा दुरूनच त्यांची गंमत
दृश्य मनोहर खरे । फुलांवर उडती फुलपाखरे! ॥ ३ ॥
हात लावता पंख फाटतिल
दोरा बांधुन पायहि तुटतिल
घरी कशी मग सांगा जातिल ?
दूर तयांची घरे । फुलांवर उडती फुलपाखरे! ॥ ४ ॥
उगाच धरिता त्यास कशाला?
अपाय करिता मुक्या जिवाला
आवडेल का हे देवाला?
हिं देवाची मुले । फुलांवर उडती फुलपाखरे! ॥ ५ ॥
- अ. ज्ञा. पुराणिक