ऋतुराजाची चाहूल
आला शिशिर संपत
पानगळती सरली,
ऋतुराजाची चाहूल
झाडावेलींना लागली
देवचाफा हा पहा ना
अंगोपांगी बहरला,
मोगराही कोवळ्याशा
पाने सजाया लागला
डोळे खिळविती माझे
जास्वंदीची लाल फुले,
बहाव्याने येथे तेथे
सोनतोरण बांधिले
'कुहू' गाऊन कोकिळा
करी वसंत-स्वागत,
तिलाही मी विनविते
शिकव ना मला गीत
- इंदिरा संत