ऊठ गोपाळजी
ऊठ गोपाळजी, जाइ धेनूकडे,
पाहती सौंगडे, वाट तूझी
लोपली हे निशी, मंद झाला शशी,
मुनिजन मानसी, ध्याति तुजला
भानु उदयाचळी, तेज पुंजाळले,
विकसती कमळे, जळामाजीं
धेनुवत्से तुला, बाहती माधवा,
ऊठ गा यादवा! उशीर झाला
उठ पुरुषोत्तमा! वाट पाहे रमा,
दाविं मुखचंद्रमा, सकळिकांसी
कनकपात्रांतरीं, दीपरत्ने बरीं,
ओवाळिती सुंदरी, तूजलागीं
जन्मजन्मांतरी, दास होऊ हरी,
बोलती वैखरी, भक्त तूझे
कृष्णकेशव करी, चरणांबुज धरी,
ऊठ गा श्रीहरी मायबापा
- कृष्णकेशव